Categorized | Aurangabad, JIH in Press, Media

माझा टिव्ही डिबेटचा एक अनुभव :- नौशाद उस्मान, औरंगाबाद

Posted on 29 October 2020 by Zonal Admin

माझा टिव्ही डिबेटचा एक अनुभव

एबीपी माझा चॅनेलवर “फ्रान्समधील हिंसा” प्रकरणावर डिबेटमध्ये नुकतंच भाग घेण्याची संधी मिळाली. त्यात अभिराम दिक्षित यांनी अन्वर राजन आणि फिरोज़ मीठीबोरवाला यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत आक्षेप घेतला की, “हे लोकं बुद्धीवादाचं उदाहरण देतांना क़ुरआनालाच कोट करतात … असा कुठं हल्ला झाला की, इस्लाम कसा शांततेचा धर्म आहे असं इस्लामचं कौतूकच सुरू होते …” धर्माच्या पलिकडे जाऊन माणुस म्हणुन हे लोकं का व्यक्त होत नाहीत, अशी त्यांची भुमिका होती. यावर अनवर राजन यांनी आम्ही धर्मापलिकडे जाऊन सद सदविवेक बुद्धीने विचार करतो असे सांगून पुन्हा एक हदिस (प्रेषित वचन) चाच दाखला दिला. म्हणून दिक्षितांचा आणखी हिरमोड झालेला दिसला. पुढे यावर मलाही काही सांगायचं होतं, पण नंतर वेळ संपल्यामुळे संधीच मिळालि नाही म्हणून इथे व्यक्त होतोय.

पुरोगाम्यांनी इस्लामचं कौतूक करू नये, असं काही लोकांना का वाटावं? त्यांनी सलमान रश्दी किंवा तसलीमा नसरीन सारखंच कडवे आणि टोकाचे पैगंबरविरोधकच राहावं ही काही पैगंबरविरोधकांची इच्छा का असावी? “कट्टर धर्मांधता” किंवा फ्रेंच राष्ट्रपतींच्या भाषेत “इस्लाम इज़ रीलीजन आॅफ क्रायसीस” अशा प्रकारचे आरोप करून म्हणजेच एक मुस्लिम म्हणून जेंव्हा प्रश्न विचारले जातील तेंव्हा त्यांची उत्तरे मुस्लिम म्हणूनच का दिली जाऊ नये? आम्ही तुम्हाला मुस्लिम समजून प्रश्न विचारावेत पण तुम्ही उत्तर मात्र धर्मापलिकडे जाऊन फक्त एक माणुस म्हणुन द्यावं, ही दुटप्पी आणि सदसद्विवेकबुद्धीला सोडून असलेली भुमिका तटस्थ विश्लेशकाचं सोवळं पांघरलेल्या पैगंबरविरोधकांची का असावी? अशा नाना प्रकारच्या प्रश्नांच्या मूळाशी जेंव्हा आपण जातो तेंव्हा काही शंका उत्पन्न होतात.

त्यापैकी एक शंका म्हणजे समतामूलक पैगंबरी शिकवणीला बदनाम करण्यासाठीच काही भांडवलवादी आणि वर्णवादी अशाप्रकारचे मुद्दे बाज़ारात आणत असतांना त्यासाठी मुस्लिम पुरोगाम्यांच्या तोंडून भरपूर पैगंबरद्वेष व्यक्त व्हावा हे तर त्यांना अपेक्षित नसावं? पण मुस्लिम पुरोगामी हे भले मुल्ला मौलवी, कट्टर मुस्लिमांवर भरपूर तोंडसुख घेत असले तरी पैगंबर व क़ुरआनाचं कौतूकच करत असल्याचं पाहिल्यावर असे वाद उकरून काढण्याच्या त्यांच्या मूळ हेतूलाच हरताळ तर फासला जात नाही ना?

आधी अरबी, उर्दू येत नसलेले मुस्लिम पुरोगामी लोकं क़ुरआन व पैगंबर चरित्र न वाचताच त्यावर तोंडसुख घ्यायचे मात्र आता त्यांची भाषांतरे इतर भाषेत प्रसिद्ध झाल्यावर त्यांना इस्लाम व मुस्लिम यांतला फरक काही अंशी स्पष्ट होऊ लागल्याचे दिसते अन त्यामुळेच काही लोकांना पोटशूळ उठले नसावे? अशा घटनांमुळे नक्कीच मुस्लिम समाज बदनाम होतो मात्र त्यानिमीत्ताने क़ुरआन पैगंबरी शिकवणीवर भरपूर चर्चा, लेखन, भाषण होऊन खरी समतामूलक पैगंबरी शिकवण लोकांपर्यंत पोहोचून लोकं ती स्वीकारत असल्याचा धसका तर पैगंबरविरोधकांनी घेतला नसावा, अशा शंकांना वाव निर्माण होतो. कारण 9/11 नंतर जिहाद, क़ुरआन, पैगंबर (सल्लम) हे गुगलवर सर्वात जास्त सर्च होऊ लागले होते अन् त्यानंतर लाखो अमेरीकन लोकांनी पैगंबरी शिकवणीची दिक्षा घेतल्याची बातमी एकदा वाचण्यात आली होती. त्यामुळे बदनामीसाठी वापरल्या जाणार्या अपप्रचाराऐवजी असा सकारात्मक प्रचार होऊ नये, यासाठी तर पुरोगाम्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न तर केला जात नाहिये ना, असे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

अशावेळी “आम्ही त्यातले नाहीच”, “आम्ही धर्मापलिकडे जातो” वगैरे बचावात्मक पवित्रा घेण्याऐवजी “तुम्ही माणुस म्हणुन विचाराल तर माणूस म्हणून उत्तर देऊ, मुस्लिम म्हणूनच जर विचारत असाल तर मुस्लिम म्हणूनच उत्तर देऊ अन् मुस्लिम असणे म्हणजे अपराध नाहीये” असे सडेतोड उत्तर दिले तर आपले ‘पुरोगामीत्व खतरे मे’ येईल अशी भावना कदाचित काही पुरोगाम्यांच्याही मनात उत्पन्न होऊ शकते.

कारण आजकाल मुस्लिमांचं किंवा पैगंबर अथवा क़ुरआनाचं समर्थन करणे म्हणजे एकप्रकारचा “सोशल स्टीग्मा” असल्याचं काही लोकं मानतात. म्हणून आम्ही कसे बॅलन्स आहोत असं मिरविण्याकरिता काहीही विचार न करता ते मुस्लिम आणि त्यांची श्रद्धा असणार्या सर्व सांस्कृतिक गोष्टींवर थोडंसं नकारात्मक बोलण्याची काही मुस्लिमेतर सहिष्णु पुरोगामी लोकांतही ‘फॅशन’ आलेली आहे, असे दिसते. हाच कित्ता मुस्लिम पुरोगाम्यांनीही गिरवावा म्हणून “धर्मापलिकडे जा” म्हणजेच “धर्म, क़ुरआन, पैगंबर हे सोडून द्या” असाच आग्रह तर हे अप्रत्यक्षपणे करत नसतील अशी शंका येते. अल्लाह करो की, या शंका चुकीच्या सिद्ध व्हाव्यात, त्या चुकीच्या असुही शकतात. एक तटस्थ निरपेक्ष दृष्टीने व्यक्त व्हा अशीही यामागे अपेक्षा असू शकते. पण मग “इस्लामचे कौतूकच सुरू होते” हे वाक्य सांगून आक्षेप का बरं घेतला जावा? “इसलामची टिकाच व्हावी” असा तर याचा अर्थ होत नसेल ना?

असे प्रश्न मनात सतत रेंगाळत असतात, भावनांची घालमेल होते. अशा लेखांद्वारे त्या भावना व्यक्त करता येतात म्हणून ठिक आहे अन् त्या भावनांचा चुकीच्या मार्गाने उद्रेक होऊ नये म्हणून त्या अशा सकारात्मक माध्यमातून व्यक्त झाल्याच पाहिजे.

फ्रान्समध्ये हिंसा करणार्या त्या युवकाचं समर्थन शक्यच नाही, त्या अमानवी घटनेचा शतशः निषेधच. पण त्या युवकालाही असेच मुस्लिम म्हणून डिवचणारे प्रश्न विचारून तू मुस्लिम नव्हे तर माणुस म्हणुन व्यक्त हो, इस्लामचं कौतूक कशाला करतो, पुरोगामी हो, असा आग्रह करून मानसिक शोषण तर केले गेले नसेल ना, याचाही सामाजिक मानशास्त्राच्यादृष्टीने स्थानिक तपास यंत्रणांनी शोध घेतला पाहिजे.

कारण अशा घटना अचानक घडत नसतात तर त्यामागे अनेक सामाजिक मानसशास्त्रीय कारणंदेखील असतात. इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून सुरू असलेले शाब्दिक हल्ले आणि त्यातून निर्माण होणारी असुरक्षिततेची भावना हेदेखील त्याचे एक कारण असल्याचं “क्रिमीनाॅलाॅजी” सांगते. अशा परिस्थितीत मुस्लिम युवक आणि बुद्धीजीवींनीही फार संयमाने आपल्या भुमिकेवर ठाम राहण्याची गरज आहे. आम्हाला जगात अल्लाहने आणि भारत देशात संविधानानेही माणुस म्हणुन सोबतच मुस्लिम म्हणुनही व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे, तेदेखील आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि न भिता ते सभ्य शब्दांत निक्षून सांगितले पाहीजे. अशाप्रकारे सकारात्मकतेने मनातील भावभावनांना जर वाट करून दिली, योग्यपणे त्या कोंडमार्याचा निचरा झाला, त्यांना तशी संधी दिली गेली आणि इतरांनीही त्या भावना समजून घेतल्या तर एक निकोप निरागस अशा सुसंवादाला सुरूवात होऊन कदाचित फ्रान्ससारख्या घटना टाळता येतील असं वाटते. धन्यवाद!

– नौशाद उस्मान, औरंगाबाद

  • Post a comment

    Threaded commenting powered by interconnect/it code.

ऑनलाईन प्रेषित परिचय संमेलन २०२०

Get the latest updates via Email

Watch Our Latest Video

VISIT OUR OTHER WEBSITES